२९ . विमोह त्यागुनी कर्मफलांचा सिद्ध होई पार्था

 २९ . विमोह त्यागुनी कर्मफलांचा सिद्ध होई पार्था 


विमोह त्यागुनी कर्मफलांचा सिद्ध होई पार्था 
कर्तव्याने घडतो माणूस जाणुनी पुरुषार्था ।।धृ०।।

शस्त्रत्याग तव शत्रुपुढती नच शोभे तुजला 
कांतर होई समरी मग तू वीरोत्तम कसला 
घे शस्त्रांते सुधीर होऊनि रक्षा या धर्मार्था ।।१।।

कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या फुलबागा 
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा 
इहपरलोकी अशांतीने तव विक्रम झुकविल माथा ।।२।।

कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जिव्हांचा 
क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा 
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खऱ्या वेदार्था ।।३।।

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो 
कौरवांत मी पांडवात मी अणुरेणुत भरलो 
मीच घडवितो मीच मोडितो उमज अता परमार्था ।।४।।

कर्मफलांते अर्पुन मजला सोड अहंता वृथा 
सर्वधर्म परि त्यजुनि येई शरण मला भारता 
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिध्द करी धर्मार्था ।।५।।

Comments