१७ . घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
१७ . घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात ।
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परि मन खंतावतं ।
विसरली का ग भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आंचवलं ।
फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो ।
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार ।
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फूलं वेचायला नेशील तू गडे ।
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय ।
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला।
- कृ. ब. निकुंब
Comments
Post a Comment